बोगस मतदारांवर कारवाईची मागणी
कराड : कापिल (ता. कराड) येथे विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्या बोगस मतदारांची पुराव्यानिशी माहिती देऊनही कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी गणेश पवार यांनी प्रशासकीय कार्यालयाच्या दारात अभ्यंग्यस्नान केले.
बाहेरगावच्या ९ लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कापिल गावचा पत्ता असलेले आधारकार्ड बनवून मतदार यादीत नाव नोंदवले. तसेच विधानसभा निवडणुकीत या लोकांनी मतदान केले. है नऊ लोक बोगस मतदार असल्याचे तसेच त्यांनी मतदान केल्याची पुराव्यानिशी माहिती देऊनही प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे बोगस मतदारांना पाठीशी घालणाऱ्या प्रांतांची चौकशी करून कारवाई करावी. तसेच त्या सर्व बोगस मतदारांविरोधात गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी गणेश पवार यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर ८ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.
१२ ते १३ दिवस झाले तरी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने गणेश पवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी प्रशासकीय कार्यालयासमोरच अभ्यंग्यस्नान केले. शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे, जावेद नायकवडी, हत्तेकर, इजाज इनामदार, समीर बागवान, हणमंत पवार, साई शेवाळे व कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत प्रांत अतुल म्हेत्रे यांची चौकशी व कारवाई होत नाही तसेच बोगस मतदारांविरोधात गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. टप्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता बाढवण्यात येणार असल्याचे गणेश पवार यांनी सांगितले.








