100 हून वाहक, चालकांना अभ्यंगस्नान घालून फराळ वाटप
प्रतिनिधी/ सातारा
दिवाळीच्या सणांना प्रत्येकजण आपल्या घरात कुटुंबासमवेत असतो. दिवाळीचा सण साजरा करतो. परंतु काही मंडळी हे नोकरीच्या निमित्ताने जनतेची सेवा करण्यासाठी सण, उत्सवावर पाणी सोडतात. त्यामध्ये एसटीच्या कर्मचाऱयांचा समावेश होतो. पहिल्या अभ्यंगस्नानावेळी सातारा आगारात बाहेरच्या आगारातील मुक्कामी असणाऱया चालक, वाहकांना अभ्यंगस्नान घालण्याची परंपरा याही वर्षी मोठया उत्साहाने सुरु ठेवण्यात आली. तब्बल 100 हून अधिक वाहक चालकांना अभ्यंगस्नान घालून त्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
साताऱयातील मध्यवर्ती बसस्थानकात चालक आणि वाहकांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान घालण्याची परंपरा आहे.. गेली 23 वर्ष ही सेवा अखंडितपणे सुरू असून दिवाळी सणाच्या दिवशी कुटुंबापासून दूर राहून प्रवाश्यांची सेवा करणाऱया कर्मचाऱयांना कुटुंबात असल्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सातारा आगराकडून केला जातो. 100 हुन अधिक एसटीच्या कर्मचाऱयांना यावेळी सुगंधी उठणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. कर्मचाऱयांचे औक्षण करून त्यांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. सण उत्सव काळात प्रत्येक चाकरमान्य मंडळी हे विशेष करुन आपल्या गावी चार दिवस मुक्कामी असतात. आपल्या घरादारांमध्ये रमतात, सण साजरा करतात. परंतु काही नोकरदार नोकरीनिमित्ताने जनतेची सेवा करतात. त्यामध्ये एसटीच्या कर्मचाऱयांचा समावेश असतो. प्रवाशांना सुरक्षित पोहचवण्याचे काम करण्याचे काम एसटीचे कर्मचारी करत असतात. जे कर्मचारी आपल्या घरापासून लांब असतात. त्यांच्यासाठी सातारा आगाराच्यावतीने अभ्यंगस्नानाची सोय करण्यात येते. गरम पाणी, सुगंधी उठणे, तेल, साबण लावून त्यांना अभ्यंग स्नान घालून दिवाळीचा फराळ देण्यात आला.
बाहेरच्या मुक्कामी कर्मचाऱयांना दिवाळी फराळ देण्यात आला
सातारा आगाराची जी परंपरा आहे. ती यावर्षी सुरु ठेवण्यात आली होती. बाहेरच्या आगारातील 100 कर्मचारी मुक्कामी होते. त्या सर्व कर्मचाऱयांना दिवाळीचा फराळ देण्यात आला.
रेश्मा गाडेकर, आगर व्यवस्थापक








