तिसऱ्या मजल्यावरील उपकरणांचे परीक्षण पूर्ण : 100 एलईडी स्क्रीनद्वारे अयोध्येत होणार प्रसारण
वृत्तसंस्था/ अयोध्या
यंदा रामनवमीला सूर्याची किरणे राम मंदिरात विराजमान भगवान श्री रामलल्लावर अभिषेक करणार आहेत. सूर्यकिरणे 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर बसविण्यात आलेल्या ऑप्टोमॅकेनिकल सिस्टीमद्वारे थेट रामलल्लाच्या मस्तकावर 4 मिनिटांपर्यंत 75 मिलीमीटर आकाराच्या गोल टिळ्याच्या स्वरुपात दिसून येतील. या ‘सूर्य तिलका’ला देशाच्या दोन वैज्ञानिक संस्थांच्या मेहनतीद्वारे साकार केले जाणार आहे.
मंदिराचे पुजारी अशोक उपाध्याय यांच्यानुसार काही दिवसांपूर्वी सूर्य तिलकासाठी वैज्ञानिक उपकरण गर्भगृहाच्या बरोबर वर तिसऱ्या मजल्यावर बसविण्यात आले आहे. रविवारी दुपारच्या आरतीनंतर पहिले परीक्षण झाले असता सूर्यकिरणे रामलल्लाच्या ओठावर पडली. मग लेन्सला पुन्हा सेट करत सोमवारी परीक्षण झाले असता किरणे मस्तकावर पडली. यामुळे रामनवमीला सूर्य किरणांचा अभिषेक आयोजन आता निश्चित मानले जात आहे.
रामनवमीला सूर्य किरणांच्या अभिषेकाची तयारी असून याचे प्रसारण 100 एलईडी स्क्रीन्सद्वारे पूर्ण अयोध्येत होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.
गर्भगृहात अशी पोहोचणार सूर्यकिरणे
आयआयटी रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने ही सिस्टीम तयार केली आहे. प्रोजेक्टचे वैज्ञानिक देवदत्त घोष यांच्यानुसार एक रिफ्लेक्टर, 2 आरसे, 3 लेन्स, पितळेच्या पाईपद्वारे सूर्यकिरणे मस्तकावर अभिषेक करणार आहेत. रामनवमीला सूर्यकिरणांचा अभिषेक निश्चित वेळी व्हावा याकरिता सिस्टीममध्ये 19 गियर लावण्यात आले आहेत, जे सेकंदांमध्ये आरसे आणि लेन्सवर किरणांची दिशा बदलतील, अशी माहिती सीबीआरआयचे वैज्ञानिक डॉ. प्रदीप चौहान यांनी दिली आहे. ऑप्टिका या बेंगळूर येथील कंपनीने लेन्स आणि पितळेचे पाईप तयार केले आहेत.
50 क्विंटल फुलांनी सजणार मंदिर
रामनवमीनिमित्त राम मंदिराला सुमारे 50 क्विंटल फुलांनी सजविण्यात येणार आहे. राम मंदिराच्या गर्भगृहासमवेत सर्व पाच मंडपांना फुलांनी सजविण्यात येईल. याकरिता देशी-विदेशी प्रकारातील फुलांचा वापर करण्यात येणार आहे. ही फुले बेंगळूर आणि दिल्लीतून मागविण्यात आली आहे. राम मंदिरासोबत कनक भवन आणि हनुमानगढीलाही फुलांनी सजविण्यात येणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रमाणे रामनवमीला पुष्पवर्षाव केला जाणार आहे.









