वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीतर्फे नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या टी-20 प्रकारातील फलंदाज आणि गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनी आपले अग्रस्थान कायम राखले आहे.
टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा अभिषेक शर्मा 925 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा फिलसॉल्ट दुसऱ्या तर भारताचा तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आठवे स्थान मिळविले. फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे.
टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आपले अग्रस्थान कायम राखले असून या मानांकन यादीत विंडीजचा अकिल हुसेन दुसऱ्या तर अफगाणचा रशीद खान तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हॅजलवूडने दहावे स्थान मिळविले आहे. टी-20 अष्टपैलुंच्या मानांकन यादीत भारताच्या हार्दीक पंड्याने चौथे स्थान मिळविले आहे. या मानांकन यादीत पाकचा सईम आयुब पहिल्या स्थानावर असून झिम्बाब्वेचा सिकंदर रझा दुसऱ्या तर विंडीजचा रॉयस्टन चेस तिसऱ्या स्थानावर आहे.









