वृत्तसंस्था /सिमला
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंडखोरी केल्याने काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी पराभूत झाल्याने त्यांनी हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार यांना समसमान 34 मते पडली होती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठी टाकून विजयी उमेदवाराची निवड केली होती. चिठ्ठी काढण्याची पद्धत योग्य नव्हती, असा सिंघवी यांचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक होऊन अनेक आठवडे लोटल्यानंतर न्यायालयात या पद्धतीविरोधात अर्ज केला आहे. राज्यसभा निवडणुकीत चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार जाहीर केला असला तरी सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार चिठ्ठीच्या माध्यमातून विजयी उमेदवार ठरविण्याची कोणतीही स्पष्ट तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची पद्धत कायदेसंमत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.









