13 सप्टेंबरला हजर रहावे लागणार : त्याचदिवशी इंडिया समितीची बैठक
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अन् तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना ईडीने पशू तस्करी प्रकरणी 13 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलाविले आहे. 13 रोजी चौकशी करण्याच्या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप अभिषेक यांनी केला आहे.

13 सप्टेंबरला दिल्लीत विरोधी पक्षांच्या आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होणार आहे. अभिषेक बॅनर्जी हे या समितीचे सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीत आघाडीच्या रणनीति अन् पुढील कार्यक्रमांची रुपरेषा तयार केली जाणार असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले आहे.
इंडिया समन्वय समितीची पहिली बैठक 13 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. या समितीचा मी सदस्य आहे, परंतु ईडीच्या संचालकांनी त्याच दिवशी मला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसमागे राजकीय कारण असल्याचा दावा अभिषेक यांनी केला आहे.
अभिषेक बॅनर्जी हे पशू तस्करी प्रकरणी आरोपी आहेत. यामुळे अभिषेक यांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून कुठल्याही विशेष सवलतीची अपेक्षा करू नये असे प्रत्युत्तर भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी दिले आहे.
विरोधी पक्षांच्या आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर 5 समित्यांची घोषणा करण्यात आली होती. अभिषेक बॅनर्जी यांना सर्वात महत्त्वपूर्ण रणनीतिविषयक समितीत सामील करण्यात आले आहे. या समितीत एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री, दोन माजी मुख्यमंत्री, 5 राज्यसभा तर 2 लोकसभा खासदारांना स्थान मिळाले आहे. याचबरोबर डाव्या पक्षांच्या दोन नेत्यांना समितीत सामील करण्यात आले आहे.









