वृत्तसंस्था/ भोपाळ
राजस्थानच्या अभिनव चौधरीने राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीचे जेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत अभिनवने 30 गुण नोंदवत उत्तर प्रदेशच्या अंकुर गोयलचा पराभव केला. गोयलने 26 गुण नोंदवले. दिल्लीच्या अर्पित गोयलने 21 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. पात्रता फेरीत अभिनवने 584 गुण घेत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती. या फेरीत त्याने नोंदवलेले गुण सर्वाधिक ठरले.
पुरुषांच्या कनिष्ठ रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत विजयवीर सिद्धू अंतिम फेरीत 28 गुण नोंदवत सुवर्ण पटकावले. अंतिम फेरीत त्याने हरियाणाच्या अनिश भनवालाला मागे टाकले. अनिशने 25 गुण नोंदवले. या प्रकारात पंजाबने सुवर्ण व कांस्य मिळविले. त्यांच्या राजकंवर सिंग संधूने 20 गुण नोंदवत तिसरे स्थान मिळविले. सांघिक विभागात मात्र अनिशने रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात 578 गुणांसह सुवर्ण मिळविले. समीर (578) व आदर्श सिंग (571) हे त्याच्यासोबत होते. तिघांचे मिळून 1727 गुण झाले. विजयवीरने राजकंवर व जुळा भाऊ उदयवीर यांच्यासह कनिष्ठ विभागात सांघिक सुवर्ण मिळविले.









