मेहबुबा मुफ्तीही घेणार भाग ः पुढील महिन्यात काश्मीरमध्ये पोहोचणार यात्रा
वृत्तसंस्था / श्रीनगर
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँगेसची ‘भारत जोडो’ यात्रा पुढील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. या केंद्रशासित प्रदेशात यात्रेसंबंधी काँगेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेत यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली. उपराज्यपालांकडून यात्रेला सुरक्षा प्रदान करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काश्मीरमध्ये यात्रा पोहोचल्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यात सामील होणार आहेत.
या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेसने यात्रेत सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. भारत जोडो यात्रेत माकप नेते एम.वाय. तारिगामी देखील सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.
तत्पूर्वी काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रभारी रजनी पाटील आणि पक्षाचे नेते विकार रसूल वानी यांच्यासोबत गुलाम अहमद मीर यांनी उपराज्यपालांची भेट घेतली. काँग्रेस नेत्यांनी उपराज्यपाल सिन्हा यांच्याकडून प्रशासनाचे सहकार्य मागितले आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुमारे 3 हजार किलोमीटरचे मार्गक्रमण करून 24 डिसेंबर रोजी म्हणजेच शनिवारी राजधानी दिल्लीत पोहोचली. या यात्रेने 107 दिवसात सुमारे 3 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून सुरू झाली होती. आतापर्यंत 9 राज्यांमधून या यात्रेने वाटचाल केली आहे. निश्चित कार्यक्रमानुसार राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ही यात्रा श्रीनगरपर्यंत जाणार आहे, याकरता त्यांना अद्याप 500 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास करावा लागणार आहे.









