वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी एका प्रकरणात अब्दुल्ला आझम खान याच्या शिक्षेवर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या याचिकेवर सुनावणी केली. अब्दुल्ला आझम याला मुरादाबाद न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर यावषी फेब्रुवारीमध्ये त्याला आमदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. एप्रिलमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली होती.
सपा नेते आझम खान आणि त्यांच्या मुलावर 2008 मध्ये दाखल झालेल्या 15 वर्ष जुन्या गुन्हेगारी प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 341 आणि 353 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी शक्तीचा वापर करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर विधानसभा सदस्य म्हणून ते अपात्र ठरल्यानंतर स्वार विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. या जागेवर अपना दलाचे शफीक अहमद अन्सारी विजयी झाले होते.









