ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचा भूखंड अब्दुल सत्तार यांनी गिळल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांनी सामना या वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रण ट्विट करत औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू… आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला, असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
राऊतांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दे. भ. देवेंद्रजी हे खरे आहे? औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू… आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सुध्दा लूट सुरु आहे”, असे म्हणत सत्तारांवर कारवाई करण्याची मागणी राऊतांनी फडणवीसांकडे केली आहे.
दे.भ. देवेंद्र जी
हे खरे आहे?औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू..आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला..
भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सुध्दा लूट सुरु आहे..
काय करताय बोला@BJP4Maharashtra@AmitShah @Dev_Fadnavis @PMOIndia pic.twitter.com/8EU8bUi2Ki— Sanjay Raut (@rautsanjay61) June 18, 2023
सामनाच्या वृत्तानुसार, सिल्लोडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गट क्र. 92 मध्ये 2007 साली नॅशनल एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात आली होती. समीर अहमद नावाचा अब्दुल सत्तारांचा नातलग या सोसायटीचा कर्ताधर्ता होता. या सोसायटीत एकूण 205 भूखंड आहेत. या भूखंडांच्या सर्व खरेदीदारांना रीतसर खरेदीखत करून सातबारावरही त्याची नोंद देखील घेण्यात आली होती. मात्र, कालांतराने सत्तार यांना मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली. त्यामुळे मेडिकल कॉलेजला जागा मिळवण्यासाठी अब्दुल सत्तार आणि त्यांच्या दोन मुलांनी सोसायटीतील प्लॉटधारकांना त्रास द्यायला सुरवात केली. ज्यात निल्लोड येथील अप्पाराव गिरजाराम गोरडे यांचा देखील 85 क्रमांकाचा 1300 चौरस फुटांचा प्लॉट आहे. तर गोरडे यांचा मुलगा योगेश लष्करात जवान असून त्याने हा प्लॉट विकत घेतला होता. सध्या ते राजस्थानात जोधपूर येथे कर्तव्यावर आहेत. इतर प्लॉटप्रमाणे गोरडे यांचा देखील प्लॉट बळकावण्यासाठी सत्तार यांनी गोरडे कुटुंबावर प्रचंड दबाव आणला. गोरडे कुटुंबाची वेगवेगळय़ा पद्धतीने कोंडी केली गेली. मात्र एवढ करून देखील गोरडे यांनी प्लॉटचे दानपत्र करून देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सत्तार यांच्या समर्थकांनी गोरडे यांच्या प्लॉटवर सर्व शासकीय यंत्रणांना हाताशी धरून बेकायदा कब्जा केला असं सामनाने आज प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.








