‘युएनएससी’ची घोषणा ः भारताकडून निर्णयाचे स्वागत
संयुक्त राष्ट्र / वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (युएनएससी) पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. तसेच त्याचा समावेश बंदी असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केला. या यादीत समाविष्ट झालेल्या व्यक्ती किंवा संस्थेची मालमत्ता गोठवली जाते. तसेच त्याला प्रवास करण्याचीही परवानगी मिळत नाही. भारत आणि अमेरिकेने मक्कीला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याचा प्रस्ताव ‘युएनएससी’समोर ठेवला होता. मात्र, जून 2022 मध्ये चीनने शेवटच्या क्षणी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता.
दहशतवादी अब्दुल रहमान मक्की हा हाफिज सईदचा मेहुणा आहे. तसेच 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा सदस्य आहे. मक्की पाकिस्तान इस्लामिक वेल्फेअर ऑर्गनायझेशन अहल-ए-हदीस व्यतिरिक्त लष्कर-ए-तोयबा संघटनेवरही वर्चस्व गाजवतो. भारताविरुद्ध कट रचण्यात आणि हल्ल्यांमध्ये मक्की नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मक्कीने मुंबईत दहशत माजवण्याचा खतरनाक कटही रचला होता. तसेच जम्मू काश्मीरमध्ये निधी गोळा करण्यासाठी, भरती करण्यासाठी आणि हल्ल्यांची योजना आखण्यासाठी तरुणांची भरती करण्यात आणि कट्टरपंथी बनवण्यात त्याचा सहभाग आहे. दहशतवादी संघटनांच्या कारवायांसाठी निधी उभारण्यातही त्याची भूमिका आघाडीची राहिली आहे. युएनएससीने मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केल्यामुळे आता त्याची मालमत्ता जप्त होणार आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने मक्कीला दहशतवादासाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी दोषी ठरवत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
भारताने केले निर्णयाचे स्वागत
युएनएससीच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आनंद व्यक्त केला आहे. अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले. भारत दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन अवलंबण्यास कटिबद्ध आहे. दहशतवादाविरुद्ध विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीय कारवाई करण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव आणत राहील. आम्ही कोणत्याही दहशतवादी कारवाया सहन करणार नाही, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.









