कोडचवाड येथील युवकाबाबत संभ्रम : दुचाकी येडोगा बंधाऱ्याजवळ सापडली : नंदगड पोलिसांकडून तपास सुरू
खानापूर : तालुक्यातील कोडचवाड येथील बेपत्ता युवकाची दुचाकी येडोगा बंधाऱ्याजवळ सापडली. त्यामुळे त्याचे अपहरण, घातपात की आत्महत्या याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, नंदगड पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, येडोगा येथील बंधाऱ्याशेजारी एक बेवारस दुचाकी सायंकाळी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या लोकांना दिसली. याची माहिती नंदगड पोलिसांना त्यांनी दिली. नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी. एस. पाटील, उपनिरीक्षक सपाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी केए 22 एचसी 5429 या नंबरची दुचाकी पडलेली दिसली. याची माहिती आसपासच्या गावात पसरल्यावर सदर दुचाकी कोडेचवाड येथील संपतकुमार निंगाप्पा बडिगेर यांच्या मालकीची असल्याचे समजले. त्यानंतर घरच्या लोकांशी पोलिसांनी संपर्क साधला असता संपतकुमार सदर दुचाकीवरून कोडचवाड येथून खानापूरला येण्यासाठी सकाळी दहा वाजता घरातून निघाला होता. यादरम्यान तो येडोगा येथून जात असताना शेजारच्या काही लोकांना दिसला होता.
दुचाकीच्या पाकिटात सापडली गाडीची चावी
येडोगा बंधाऱ्याजवळ दुचाकी आढल्यानंतर पोलिसांनी आसपास शोध घेतला असता दुचाकीची चावी गाडीच्या टाकीच्या पॉकेटमध्ये दिसून आली. मात्र दुचाकीचे कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नाईक, खानापूरचे सीपीआय मंजुनाथ नाईक, नंदगडचे निरीक्षक सी. एस. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून, नदीपात्रासह इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही सापडले नाही. नदीपात्रात पाणी नसल्याने शोध थांबवण्यात आला आहे.
संपतकुमारबाबत तर्कवितर्क
संपतकुमारचा मोबाईल सकाळी 10.50 मिनिटांनी स्वीचऑफ झाल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, संपतकुमारचे अपहरण, घातपात की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
नंदगड पोलिसात उशिरा फिर्याद दाखल
याबाबत नंदगड पोलिसात रात्री उशिरा त्यांच्या घरच्याकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे. नंदगड पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे. संपतकुमार यांचे कुटुंबीय कोडचवावाड येथील सुप्रसिद्ध कारागीर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे याचवर्षी लग्न झाले असून तो खानापूर येथील महाविद्यालयात शिक्षणही घेत आहे असे समजते.