वाकरे,प्रतिनिधी
Kolhapur : खुपिरे (ता.करवीर) येथील तंटामुक्त अध्यक्षपदासाठी हात वर करून झालेल्या मतदानात सत्ताधारी गटाचे आबासो शामराव पाटील यांना २३० मते मिळाली,त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.जनतेतून उभारलेले सचिन पाटील यांना ५१ मते मिळाली तर ४७ ग्रामस्थ तटस्थ राहीले. या खास ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच तृप्ती पाटील होत्या.यावेळी पोलीस बंदोबस्त होता.
खुपिरे ग्रामपंचायतीत कुंभी कारखाना संचालक संजय पाटील यांच्या गटाची सत्ता आहे.बुधवारी तंटामुक्त अध्यक्ष निवड व अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलवण्यात आली. विषय वाचन ग्रामसेवक तबसूम आतार यांनी केले.खासदार,आमदार ,लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जो विकास झाला याबद्दल अभिनंदनाचा ठराव माजी सरपंच संजय पाटील यांनी मांडला. त्यानंतर सचिन पाटील यांनी १५ वा वित्त आयोग व आमदार निधी खर्च झालेल्या कामाची माहिती द्यावी अशी मागणी केली.दिलीप पाटील यांनी गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना आहे,मात्र सेवा मिळत नाही ,तसेच लम्पी आजार वाढत आहे,त्यामुळे कर्मचाऱ्यांना व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी संजय पाटील यांनी सहा महिन्याची सुधारणा करण्याची त्यांना मुदत देऊन सीसीटीव्ही कॅमेरा पशुवैद्यकीय दवाखान्यात बसविण्यात येईल असे सांगितले. शाळा व्यवस्थापन समिती अप्पा रेवडे यांनी शाळेमध्ये भौतिक सुविधा मिळाव्या व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी अशी मागणी केली.
तंटामुक्त अध्यक्ष निवड बिनविरोधसाठी प्रस्ताव तुकाराम पाटील यांनी मांडला.ग्रामस्थांनी दोन्ही उमेदवारांना बिनविरोध करण्यासाठी चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी आबासो पाटील व सचिन पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र तोडगा न निघाल्यामुळे हात वर करून मतदान घेण्याचा निर्णय झाला.यावेळी गुप्त मतदान घ्यावे अशी मागणी सचिन पाटील यांनी केली.आज ग्रामसभेला ३२८ ग्रामस्थ उपस्थित होते. हात वर करून मतदान झाले. सुरुवातीला सचिन पाटील यांना ५१ मते मिळाली,तर आबासो पाटील यांना २३० मतदान मिळाले, तसेच ४७ ग्रामस्थ तटस्थ राहिले. ग्राम विकास अधिकारी आर के पाटील यांनी आबासो पाटील यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी पाणीपट्टी दराबाबत चर्चा झाली.
कृषी सहाय्यक संतोष मोरे यांनी पी एम किसान योजनेबाबत बाबत माहिती दिली. यावेळी कुंभी कारखाना संचालक संजय पाटील ,संजय सखाराम पाटील, शिवाजी गुरव, पोलीस पाटील सविता गुरव ,उपसरपंच सागर पाटील, हिंदुराव जांभळे,सरदार बंगे ,एकनाथ पाटील, सदस्य अमर कांबळे, तानाजी पाटील, सचिन कुंभार, युवराज पाटील सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.









