आयसीसीचा 50 षटकांचा विश्वचषक असो, टी20 विश्वचषक असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी सदर स्पर्धा ही भारत-पाकिस्तान सामन्याविना अधुरीच म्हणा. किंबहुना चॅम्पियन्स ट्रॉफीचे पडघम वाजल्यानंतर वेध लागले ते भारत-पाकिस्तान मॅचचे. आज ती वेळ किंवा घटिका जवळ येऊन ठेपली. भारत जर अंतिम सामन्यात पोहोचला तर दुबईत एकंदरीत पाच सामने होणार आहेत. परंतु खरी चर्चा ती भारत-पाकिस्तान सामन्याचीच. जगाच्या पाठीवर तुम्ही कसेही पराभूत व्हा. अगदी व्हाईट वॉश मिळाला तरी चालेल. परंतु आयसीसीच्या कुठल्याही इव्हेंटमध्ये पाकिस्तानकडून पराभव नकोच. अगदी 90 च्या दशकातील मराठी नाटकातील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम यांच्या शब्दात सांगायचं झालं तर नाय, नो, नेव्हर.! (‘नाय नो नेव्हर’ हे नाटक त्या काळी रंगभूमीवर प्रचंड गाजलं होतं). या सामन्यात करोडो क्रिकेट रसिकांच्या भावना गुंतलेल्या असतात. किंबहुना माझ्यासारखे लाखो चाहते आपला देव पाण्यात ठेवून विजयासाठी साकडं घालतात.
1992 पासून ते 2023 पर्यंत 50 षटकांच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला आसमान दाखवलंय. एखाद दुसरा अपवाद किंवा 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा. भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की स्लेझिंग हा शब्द आपोआप आपल्या ओठावर येतो. 1992 मध्ये मियांदाच्या माकड उड्या, त्यानंतर किरण मोरे यांनी त्याला दिलेले रोखठोक उत्तर. 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये आमिर सोहेलने दाखवलेली ती बॅट. आणि त्या बॅटला त्रिफळाचीत करून व्यंकटेश प्रसादने दिलेले ते उत्तर, आपण सर्वश्रुत आहातच. या सर्व घटनांवरती कळस तो काय ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’ हे सेहवागने शोएबला दिलेल उत्तर. भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय लढती आजकाल जवळपास बंद झाल्या आहेत. त्यामुळे आयसीसी इव्हेंटच्या माध्यमातून भारत व पाकिस्तानचे सामने हे क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच म्हणा. सदर स्पर्धा या संबंधित यजमानांच्या देशात खेळविले जातात तर काही हायब्रीड मॉडेलच्या धर्तीवर खेळविले जातात, जशी सध्याची चॅम्पियन्स ट्रॉफी.
29 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसीची टूर्नामेंट होतेय. मागील दोन आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये प्रथम 2023 ची विश्वचषक स्पर्धा आणि त्यानंतर 2024 ची टी20 स्पर्धा यात पाकची कामगिरी खूपच निराशाजनक होती. त्यातच अफगाणिस्तानकडून मिळालेला पराभव जखमेवर मीठ चोळणारा होता. त्यातच या स्पर्धेच्या माध्यमातून किवी विऊद्ध पत्करलेली शरणागती ही निश्चितच चिंतेची बाब पाकिस्तानसाठी. खऱ्या अर्थाने पाकिस्तानचं मागच्या सामन्यात पानिपत झालं. साहजिकच भारताविऊद्धच्या या सामन्यात पाकिस्तानवर प्रचंड दबाव असणार. फरक एवढाच की हा सामना पाकिस्तानऐवजी दुबईत असणार. या सामन्याचा विचार केला तर फकर जमान या पूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध नाही. साहजिकच फलंदाजीचा विचार केला तर बाबर आणि रिजवान यांच्यावर खूप दडपण असणार. त्यांना या सामन्यात खऱ्या अर्थाने जर रंगत आणायची असेल तर त्यांचा पहिला बॉलिंग पॉवर प्ले निर्णायक असेल. दुसऱ्या बाजूला भारतीय चमूत नेमके 11 खेळाडू कोण? चक्रवर्ती आणि अर्शदीप यांना संधी मिळणार का? हा ही कळीचा मुद्दा भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून राहील. विराट कोहलीच्या क्लासबद्दल आपण काय बोलायचं! परंतु मागील काही सामन्यात तो स्पिनर्सला चाचपडत खेळताना बघून खूप वाईट वाटतं. सलग पाच वेळा तो लेग स्पिनरला बाद झाला आहे हे विशेष. परंतु म्हणतात ना क्लास इज परमनंट फॉर्म इज टेम्पररी. मानसिक दबाव काय असतो तो खऱ्या अर्थाने पडताळून पाहतोय. भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील अक्षम्य चुका या सामन्यात टाळल्या पाहिजेत, विशेषत: ‘ते’ सोडलेले झेल.
हा सामना जिंकल्यानंतर उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं होणार काय हे आत्ताच भाकित करणे कठीण आहे. कदाचित भारत, बांगलादेश, न्यूझीलँड तिन्ही संघ दोन सामने जिंकू शकतात. त्यामुळे उपांत्य फेरीचा प्रवेश नेट रन रेटवरही जाऊ शकतो. परंतु करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टिकोनातून उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी हा या स्पर्धेचा कदाचित गौण भाग आहे. त्यांना पाकिस्तान विऊद्ध फक्त विजय आणि विजयच हवाय. कदाचित आयसीसी इव्हेंटमधील हे त्रिकालबाधित सत्य आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही.
या सामन्यातील प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. किंबहुना एक चूक राजाचा रंक आणि रंकाचा राव बनवू शकतो. तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीला गवसणी घाला अथवा नको घालू तुम्ही फक्त पाकिस्तानला हरवा हीच माफक अपेक्षा क्रिकेट रसिकांची असते. महाभारतात शिशुपालाचे 100 अपराध माफ केले गेले होते. या सामन्यात एक अपराध सोडाच, एक छोटीशी चूक माफ नाही. किंबहुना दगडी चाळ चित्रपटातील संवादाप्रमाणे चुकीला माफी नाही! 2017 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात भारताचा जो एकतर्फी पराभव झाला होता त्या पराभवाचे उट्टे काढण्याची चांगली संधी भारतासमोर आली आहे. भारतीय संघ या पराभवाची परतफेड व्याजासहित करतो की नाही हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘डरना मना है’ असा चित्रपट आला होता. परंतु या सामन्याच्या निमित्ताने ‘हारना मना है’ असंच म्हणावंसं वाटतं, एवढं मात्र खरं!









