सांगरूळ, वार्ताहर
Kolhapur News : आमशी (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आरती सरदार सावंत यांची बिनविरोध निवड झाली. सत्ताधारी आघाडीच्या फॉर्म्युलानुसार पल्लवी जयदीप पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. नूतन सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक विस्तार अधिकारी विजय नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन आरती सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवशंभो विकास आघाडीने ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली होती. यावेळी सरपंच व उपसरपंच पदावर प्रत्येकाला संधी देण्यासाठी आघाडीच्या वतीने फॉर्मुला ठरविण्यात आला. यानुसार शिवराज ग्रुपच्या उज्वला रामनाथ पाटील व पल्लवी जयदीप पाटील यांना पहिली दोन वर्षे संधी देण्यात आली . यावेळी श्रीराम सहकार समूहाच्या आरती सावंत यांना सरपंच पदाची संधी मिळाली.आरती सावंत या महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सरदार सावंत यांच्या पत्नी आहेत.
लोकप्रतिनिधी ,आघाडीचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन आमशी गावात जास्तीत जास्त विकास कामे राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन सरपंच आरती सावंत यांनी यावेळी दिली.
उपसरपंच बाजीराव कांबळे ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील भगवान गुरव नामदेव पाटील,शिवाजी पाटील, उज्वला पाटील, पल्लवी पाटील, रेश्मा लोखंडे, तेजस्विनी पाटील, संगीता पाटील, ग्रामसेवक अशोक कांबळे उपस्थित होते. निवडीनंतर सरपंच आरती सावंत यांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवराज समूहाचे अध्यक्ष डी. एस. पाटील, राम समूहाचे अध्यक्ष आर. टी. पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव पाटील, माजी उपसरपंच कृष्णात पाटील, रामनाथ पाटील, दिनकर पाटील, बाजीराव पाटील, एन.टी.सातपुते, यशवंत सावंत, राजाराम पाटील,भाऊसो पाटील,पैलवान सरदार सावंत आदी उपस्थित होते.









