आरे-वारे येथे समुद्रात बुडून चौघांचा अंत
रत्नागिरी: रत्नागिरीजवळील आरे-वारे समुद्रात बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजता ही घटना घडली आहे. मृतांमध्ये मुंबईतील मुंब्रातून आलेल्या दोन भावंडांचा आणि रत्नागिरीतील ओसवालनगर येथील पती-पत्नीचा समावेश आहे.
एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले. यामध्ये तीन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनेद बशीर काझी (30), पत्नी जैनब जुनेद काझी (28, दोन्ही रा. ओसवालनगर-रत्नागिरी), उजमा समशुद्दीन शेख (17), उमेरा समशुद्धीन शेख (16, दोन्ही रा. मुंबई-मुंब्रा) अशी मृतांची नावे आहेत. काझी कुटुंबीय हे रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथे भाड्याने राहतात. त्यांच्याकडे मुंब्रा येथील पाहुणे म्हणून उमेरा आणि उजमा या तरुणी आल्या होत्या.
शनिवारी सायंकाळी दुचाकीवरून ते आरे-वारे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. या बदललेल्या वातावरणामुळे समुद्र खवळलेला होता. यावेळी आरे-वारे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या या चौघांना तेथे पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. अचानक उसळलेल्या लाटांनी हे चौघेही पाण्यात ओढले गेले.
बुडणाऱ्या त्या चौघांची आरडाओरड ऐकताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांनी बुडालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. शोधमोहिमेनंतर सायंकाळी 7 वाजता त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले होते.








