कारागृहातील बॉडी मसाजचा व्हिडीओ भाजपने केला जारी ः आपकडून भाजपवर टीकास्त्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बेहिशेबी मालमत्ता आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओंमध्ये सत्येंद्र जैन तुरुंगात मसाज करताना दिसत आहेत. व्हिडीओनंतर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आपवर हल्लाबोल करत आम आदमी पार्टीला ‘स्पा-मसाज पार्टी’ म्हटले आहे. यापूर्वी ईडीने जैन यांना तिहार तुरुंगात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप काही काळापूर्वी केला होता.
कारागृहातील व्हिडीओ समोर आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तत्काळ सत्येंद्र जैन यांच्या बाजूने भूमिका घेतली. जैन यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तिहार कारागृहातील व्हिडीओ लीक होऊन भाजपपर्यंत कसे पोहोचले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर भाजपने जैन यांच्या आजाराची अशाप्रकारे खिल्ली उडवणे लाजिरवाणे असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
ईडीची न्यायालयात धाव
मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडीओमध्ये जैन बेडवर पडून वाचताना दिसत आहेत तर एक माणूस त्याच्या पायाला मालिश करताना दिसत आहेत. तिहार तुरुंगात बंदिस्त असलेले सत्येंद्र जैन तुरुंगात ऐषोरामी जीवन जगत असल्याचे फुटेजवरून दिसून येत आहे. व्हायरल फुटेजवर तिहार तुरुंगातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व्हिडीओबाबत न्यायालयात पोहोचले आहे. ईडीने या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयात तक्रार केली असून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजही न्यायालयाकडे सुपूर्द केले आहे.
चार सीसीटीव्ही फुटेज उघड
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याच्या कलमांखाली अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्येंद्र जैन तिहारच्या सात क्रमांकाच्या कक्षात बंद आहेत. याच कक्षातील दिल्लीच्या तिहार तुरुंगातून सत्येंद्र जैन यांचे चार व्हिडीओ जारी करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेज स्वरुपात असून या व्हिडीओंमध्ये एक व्यक्ती सत्येंद्र जैन यांच्या पायाला, डोक्मयाला आणि शरीराला मसाज करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हे व्हिडीओ 13 ते 21 सप्टेंबर दरम्यानचे आहेत.
सुविधा दिल्याबद्दल डीजी, अधीक्षक निलंबित
सत्येंद्र जैन यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी तिहार तुरुंगातील बॅरेक क्रमांक 7 चे अधीक्षक अजित कुमार यांना 14 नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. याच्या 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 4 नोव्हेंबरला तिहारचे डीजी संदीप गोयल यांना हटवून त्यांच्या जागी संजय बेनिवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच अन्य कर्मचाऱयांवरही कारवाई करण्यात आली होती.









