भाजप कार्यालयाकडे जाणाऱ्या नेते-कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजप मुख्यालयाला धडक देण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आंदोलन सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘आप’च्या नेते-कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. मात्र, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या मुद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या पक्षाच्या सर्व नेत्यांसह दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयाकडे रवाना झाले होते. या आंदोलनावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह आतिशी, सौरभ भारद्वाज आणि आप खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आपण आपल्या सर्व नेत्यांसह भाजप मुख्यालयाकडे जात असल्याचे केजरीवाल म्हणाले. जर आपल्याला तिथे पोहोचू दिले नाही तर जागीच बसून अटकेसाठी आंदोलन करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान, दिल्ली पोलिसांनी या भागात कलम 144 लागू करत निदर्शने करण्यास मनाई केली.
अतिरिक्त फौजफाटा
भाजप मुख्यालयाबाहेरील निदर्शने रोखण्यासाठी प्रत्येक चौकात व रस्तोरस्ती सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. अनेक रस्ते बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आले होते. आम आदमी पक्षाचे आंदोलन रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक मार्ग बंद करण्यात आले होते.
‘आप’ची जोरदार मोहीम
आंदोलनाच्या उद्देशाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचे सर्व खासदार, आमदार आणि इतर कार्यकर्ते निर्धारित वेळेपूर्वीच पक्ष कार्यालयात पोहोचले होते. तेथून सर्वजण भाजप कार्यालयाच्या दिशेने जाणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना थांबवण्यात आले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनार्थ तेथे मोठी गर्दीही दिसून आली. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपचे सर्व नेते भाजपच्या कार्यालयाकडेपोहोचण्यापूर्वीच त्यांना थांबवण्यात आले. त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यानंतर पक्षाला आंदोलन थांबवावे लागले.









