पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या भूमिकेवर नाराज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान आम आदमी पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली सरकारमध्ये ते समाजकल्याण मंत्री होते. राजकुमार आनंद हे आपल्या पक्षाच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भूमिकेवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहात असून त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच ईडीने राजकुमार आनंद यांच्या घराबरोबरच विविध मालमत्तांवर छापा टाकला होता.
राजीनाम्यापूर्वी राजकुमार आनंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम आदमी पक्षाचा जन्म भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला, मात्र आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे. या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणे माझ्यासाठी असह्या झाले आहे. मी या पक्षाचा, सरकारचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा देतो. माझे नाव भ्रष्टाचाराशी जोडले जाऊ नये असे मला वाटते, असे ते म्हणाले. राजकुमार आनंद हे केजरीवाल यांच्या सरकारमध्ये समाजकल्याण मंत्रालय सांभाळत होते. गेल्यावषी नोव्हेंबर महिन्यात ईडीची टीम राजकुमार आनंद यांच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचली होती. ईडीने त्यांच्याशी संबंधित अनेक मालमत्तांच्या ठिकाणी शोधमोहीम राबविली होती.