जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
प्रतिनिधी/कोल्हापूर
‘ईडी’, ‘सीबीआय’ सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधी पक्षांना खोटय़ा आरोपांमध्ये अटक करुन केंद्र सरकारकडून दडपशाही सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष शिसोदिया व माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ‘ईडी’ कडून त्रास दिला जात आहे. याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवा जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, हवाला प्रतिबंध कायद्याचा गैरवापर करुन ‘आप’च्या मंत्र्यांना अटक करण्यात येत आहे. माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात काहीच पुरावे मिळत नसल्याने त्यांना जामिन मिळू नये म्हणून केंद्र सरकारवर न्यायालय बदलण्याची मागणी करण्याची नामुष्की आली आहे. शिक्षण मंत्री मनिष शिसोदिया यांच्यावर सीबीआयने धाड टाकूनही त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. आगामी गुजरात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारकडून दडपशाही सुरु आहे.









