अरविंद केजरीवालांनी केले स्पष्ट : काँग्रेससोबत आघाडी नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आम आदमी पक्ष देखील सतर्क झाला आहे. याचमुळे आम आदमी पक्षाने दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीतील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी भाजपवर टीका केली आहे. दिल्लीतील बिघडत्या कायदा-सुव्यवस्थेसाठी गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार असल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे. तसेच केजरीवालांनी यावेळी दिल्लीत काँग्रेससोबत कुठलीच आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आम आदमी पक्ष दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. आप सर्व 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वत:चे उमेदवार उभे करणार असल्याचे केजरीवालांनी सांगितले आहे. तर दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी काँग्रेस आपसोबत आघाडी करणार नसल्याची भूमिका मांडली होती.
हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्यावर आम आदमी पक्षाचे नेते हे दिल्लीत काँग्रेसोबत आघाडी करू नये असे मत व्यक्त करत होते. आम आदमी पक्षाने दिल्ली निवडणुकीसाठी यापूर्वीच तयारी सुरू केली आहे. पक्षाने अनेक जागांवरील उमेदवारही घोषित केले आहेत.
दोन्ही पक्ष ‘इंडी’ आघाडीत सामील
आप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष हे इंडी या आघाडीचा हिस्सा आहेत. चालू वर्षात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आघाडी केली होती. परंतु या दोन्ही पक्षांना दिल्लीतील एकही जागा जिंकता आली नव्हती. दिल्लीतील सर्व 7 जागा भाजपने जिंकल्या होत्या. तर हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि आप यांच्यात जागावाटपावरून मतैक्य झाले नव्हते. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. हरियाणात भाजपने स्वबळावर बहुमत मिळवत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला मोठा झटका दिला होता.









