आजच्या दिल्लीतील बैठकीला अनुपस्थित राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीचे नेते आज, शनिवारी दिल्लीत एकत्र येणार आहेत. मात्र, या बैठकीत आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सहभागी होणार नसल्याचे समजते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा ‘इंडिया’ आघाडीचे नेते आज संध्याकाळी दिल्लीत एकत्र भेटणार आहेत. या बैठकीला कोण-कोणते पक्ष सहभागी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलावल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा केली आहे. मात्र, नेत्यांच्या उपस्थितीविषयी साशंकता व्यक्त होत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनापूर्वीच बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सुधारणा प्रक्रियेवरून (एसआयआर) गोंधळ सुरू आहे. याप्रश्नी विरोधकांकडून आवाज उठविण्यासाठी बैठकीत प्राधान्याने चर्चा होऊ शकते.
‘इंडिया’ची शेवटची बैठक यावर्षी 1 जून रोजी झाली होती. यामध्ये केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचवेळी, लोकसभा निवडणुकीसंदर्भात 5 जून 2024 रोजी बैठक झाली होती. ‘इंडिया’ आघाडीच्या स्थापनेनंतर त्यांनी एकूण सहा बैठका घेतल्या आहेत. पहिली बैठक 23 जून 2023 रोजी पाटणा येथे नितीशकुमार यांनी बोलावली होती. नंतर नितीश यांनी ‘इंडिया’ आघाडी सोडून रालोआमध्ये प्रवेश केला होता.
तृणमूल आणि आप का येणार नाहीत?
तृणमूल काँग्रेस 21 जुलै रोजी ‘शहीद दिवस’ साजरा करत असल्यामुळे त्यांचे नेते कोलकात्यात व्यग्र असतील. त्याचवेळी, आम आदमी पक्षाचे नेते गुजरात आणि इतर राज्यांमध्ये आपल्या विस्तार मोहिमेत व्यग्र आहेत. आम आदमी पक्षाने अनेक राज्यांमध्ये काँग्रेसशी थेट लढण्याचा मार्ग निवडला असून ‘इंडिया’ युती फक्त लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित होती, असे ‘आप’च्या नेत्यांचे म्हणणे आहे. तथापि, काही पक्ष बैठकीला आले नसले तरीही संसदेत विरोधी पक्ष एकजूट राहील, असा आशावाद काँग्रेसने व्यक्त केला आहे.









