वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फरीदाबादच्या अनंगपूर येथील अतिक्रमण हटविण्याच्या अभियानाच्या विरोधात 13 जुलै रोजी होणाऱ्या महापंचायतला आम आदमी पक्षाने समर्थन जाहीर केले आहे. याचबरोबर दिल्लीच्या ग्रामीणच्या 300 गावांच्या युवांनी अधिकाधिक संख्येत अनंगपूरच्या महापंचायतमध्ये सामील व्हावे असे आवाहन ‘आप’ने केले आहे.
स्वत:च्या गावाच्या रक्षणासाठी आम्ही दिल्लीच्या सर्व 360 गावांचे युवा, खासकरून युवा पिढीला 13 जुलै रोजी अनंगपूर येथे होणाऱ्या महापंचायतमध्ये सामील होण्याचे आवाहन करतो. आम्ही सर्व मिळून भाजप सरकारच्या कारवाईचा विरोध करण्यासाठी एक संयुक्त रणनीति तयार करू असे वक्तव्य ‘आप’ दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले आहे.
भारद्वाज यांनी यावेळी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये कथित स्वरुपात महापालिका आणि दिल्ली विकास प्राधिकरणाकडून नोटीस जारी करणे आणि अतिक्रमण पाडविण्याच्या मोहिमेचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने पूर्वीच लोकांच्या जमिनींचे अधिग्रहण केले आहे. आता उर्वरित जमीनही सरकार बळजबरीने हिरावून घेऊ पाहत आहे. आम्ही या कारवाईला विरोध करतो. अनंगपूर येथे होणाऱ्या सर्व समाजाच्या महापंचायतीत आम आदमी पक्षाचे प्रतिनिधिमंडळ सामील होणार असल्याचे भारद्वाज यांनी सांगितले.
वन विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर अनंगपूर येथील ग्रामस्थ मागील 10 दिवसांपासून निदर्शने करत आहेत. तर आता अनंगपूर संघर्ष समितीने 13 जुलै रोजी महापंचायत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदवनपासून अरावलीपर्यंत निर्माण करण्यात आलेले कोट्यावधी रुपयांचे फार्म हाउस वन अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त करत सुमारे 10 एकर जमीन अतिक्रमणांपासून मुक्त करविली होती.









