महिला आमदाराचा राजीनामा, राजकारणालाही अलविदा
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथील खरार विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनमोल गगन मान यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. ‘मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे दिलेला माझा राजीनामा स्वीकारला जावा. माझ्या शुभेच्छा पक्षासोबत आहेत. मला आशा आहे की पंजाब सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल’, असे अनमोल गगन मान यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.
अनमोल गगन मान यांनी 15 जुलै रोजीच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतर चौथ्याच दिवशी पक्ष सोडण्याच्या त्यांच्या अचानक निर्णयामुळे राजकीय जगतात खळबळ उडाली आहे. अनमोल गगन मान राजकारणासोबतच पंजाबी गायिका म्हणूनही नावाजलेल्या आहेत.
अनमोल गगन मान यांनी आम आदमी पक्षासोबत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2022 च्या निवडणुकीत त्या पहिल्यांदाच खरार विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. यापूर्वी त्या मान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिल्या आहेत. त्या काळात त्यांनी पर्यटन आणि संस्कृती, गुंतवणूक प्रोत्साहन, कामगार आणि आतिथ्य विभागाची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु मान सरकारने 23 सप्टेंबर 2024 रोजी त्यांना कॅबिनेट पदावरून काढून टाकले. त्यावेळी मुख्यमंत्री मान यांनी 4 मंत्र्यांना पदावरून काढून टाकले होते.
राजकारणात येण्यापूर्वी त्या पंजाबी गायिका होत्या. अनमोल गगन मान यांचा जन्म 1990 मध्ये मानसा येथे झाला. त्यांनी चंदीगडमधून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी प्रथम मॉडेलिंग आणि नंतर गायनात करिअर केले. गेल्यावर्षी जूनमध्ये त्यांनी वकील शाहबाज सोही यांच्याशी विवाह केला होता.









