आमदार उमेश मकवाणा यांनी दिला राजीनामा
वृत्तसंस्था/अहमदाबाद
गुजरातमध्ये बोटादचे आमदार उमेश मकवाणा यांनी आम आदमी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तर यानंतर पक्षविरोधी कारवायांप्रकरणी मकवाणा यांना पक्षातून निलंबित केल्याची माहिती आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांनी दिली आहे. तत्पूर्वी मकवाणा यांनी आम आदमी पक्ष हा विचारसरणीपासून हटल्याचा दावा करत पक्षनेतृत्वालाच लक्ष्य केले होते. पोटनिवडणुकीच्या आनंदादरम्यान आम आदमी पक्षाला हा झटका बसला. मकवाणा यांनी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आम आदमी पक्ष विचारसरणीपासून भटकला आहे.
भाजप-काँग्रेसनंतर आम आदमी पक्षाची स्थितीही तशीच झाली आहे. भाजपमधून आम आदमी पक्षात मी मागास समाजाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी आलो होतो, परंतु असे घडले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच आम आदमी पक्ष मानत नाही असा दावा मकवाणा यांनी केला आहे. मकवाणा यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत पोटनिवडणूक लढवून दाखवावी. मकवाणा यांना यापूर्वी मतदारसंघात राहण्याची ताकीद देण्यात आली होती. मकवाणा यांच्याविषयी भ्रष्टाचाराच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या असावा आप प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांनी केला आहे.
‘आप’कडे केवळ 4 आमदार
मकवाणा यांना भाजपने स्वत:च्या बाजूने वळविले आहे. विसावदर येथील आम आदमी पक्षाच्या विजयामुळे भाजप बिथरला असल्याचे गढवी यांनी म्हटले आहे. तर मकवाणा यांना पक्षातून निलंबित केल्यावर आम आदमी पक्षाचे गुजरातमध्ये केवळ 4 आमदार राहिले आहेत. यात पोटनिवडणुकीत विजयी झालेले गोपाळ इटालिया, डेडियापाडाचे आमदार चैतर वसावा, जाम जोधपूरचे हेमंत खवा व गारियाधारचे सुधीर वाघाणी सामील आहेत.









