निवृत्त अधिकाऱयांची निवडणूक आयोगाकडे मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करविण्याची मागणी करणारे पत्र 57 निवृत्त अधिकाऱयांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे. आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शासकीय कर्मचाऱयांचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला आहे. शासकीय कर्मचाऱयांद्वारे गुजरात विधानसभा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पत्रात म्हटले गेले आहे.
निवृत्त अधिकाऱयांच्या पत्रात 3 सप्टेंबर रोजी राजकोट येथे झालेल्या केजरीवालांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय कर्मचाऱयांना आम आदमी पक्षाच्या विजयासाठी काम करण्याचे सांगितले होते असे पत्रात म्हटले गेले आहे.
केजरीवालांवर अनेक आरोप
शासकीय कर्मचाऱयांचा वापर केजरीवाल स्वतःच्या पक्षाच्या प्रचारासाठी करत आहेत. केजरीवालांनी आगामी निवडणुकीत होमगार्ड, पोलीस, अंगणवाडी कार्यकर्त्या, शासकीय चालकांना पक्षाचे काम करण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही राज्यात नागरी कर्मचाऱयाचे काम केवळ शासकीय योजनांना लोकांपर्यंत पोहोचविणे असते. त्यांचा राजकारणाशी कुठलाच संबंध नसतो. ते कुठल्याच पक्षासाठी काम करू शकत नाहीत, परंतु केजरीवालांनी स्वतःच्या पत्रकार परिषदेत पक्षासाठी प्रचार करण्याचे आवाहन केले असल्याचा आरोप या अधिकाऱयांनी केला आहे.
सर्वसामान्यांच्या विश्वासाला धक्का
केजरीवालांच्या या विधानांनंतर सर्वसामान्य जनतेचा शासकीय कर्मचाऱयांवरील विश्वास डळमळीत होणार आहे. प्रत्येक शासकीय कर्मचारी कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षासाठी काम करतो असे जनतेला वाटू लागल्याचे अधिकाऱयांनी पत्राद्वारे आयोगाला कळविले आहे.
अनेक अधिकाऱयांचा समावेश
या पत्रावर अनेक निवृत्त अधिकाऱयांनी स्वाक्षरी केली आहे. यात केरळचे माजी सचिव आनंद बोस, निवृत्त आयएएस अधिकारी आर.डी. कपूर, सौरभ चंद्र, श्रीधर राव, अभिक घोष, सी.एस. खैरवाल, निवृत्त आयआरएस अधिकारी एस.के. गोयल, निवृत्त आयएफएस अधिकारी निरंजन देसाई, सतीश मेहता, भसवती मुखर्जी, विद्यासागर, बाला शेट्टी, माजी आयपीएस अधिकारी उमेश कुमार, एम. मोहन राज, निर्मल कौर, महेश सिंघला, शीला प्रिया, जी. प्रसन्ना कुमार, संजय दीक्षित, पी.बी. राममूर्ती यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.









