विधानसभा निवडणुकीचा आज निकाल : सकाळी 8 वाजता 19 केंद्रांवर मतमोजणीला प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. निवडणूक आयोगाचे सुमारे 5 हजार कर्मचारी मतमोजणीत सहभागी होतील. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर साधारणपणे सकाळी 9 किंवा 10 वाजेपर्यंत ट्रेंड स्पष्ट होणार असून कोणता पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल हे समजेल. 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान निवडणुकीचे निकाल सर्वांना कळतील अशी अपेक्षा आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. यामध्ये राज्यातील एकूण 70 विधानसभा जागांसाठी 60.44 टक्के लोकांनी मतदान केले. एकंदर 699 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झालेले असून आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा निर्णायक दिवस आला आहे. 8 फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या दिल्लीत कोणता पक्ष पुढचे सरकार स्थापन करणार आहे हे स्पष्ट होईल. मतमोजणीसाठी दिल्लीतील 11 जिह्यांमध्ये 19 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या सर्व ईव्हीएम 19 ठिकाणी बांधलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला पोस्टल मतदानाची गणती होईल. म्हणजेच मतदानाच्या दिवसापूर्वी मतपत्रिकांद्वारे मतदान केलेल्या सरकारी कर्मचारी, वृद्ध आणि अपंग मतदारांच्या मतांची मोजणी सुरू होईल. या प्रक्रियेला सुमारे अर्धा ते एक तास लागेल. यानंतर लगेचच ईव्हीएमवरील मतदानाची मोजणी सुरू होईल.
दिग्गजांचे भवितव्य ठरणार
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांनी निवडणूक लढवली. संदीप दीक्षित हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत. तर, प्रवेश वर्मा हे साहेबसिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. तसेच दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होत्या. येथे त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि भाजपचे रमेश बिधुरी यांच्याशी झाला. याशिवाय, आम आदमी पक्षाच्या तिकिटावर जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मनीष सिसोदिया हे भाजपचे तरविंदर सिंग मारवाह आणि काँग्रेसचे फरहाद सुरी यांच्याविरुद्ध निवडणूक रिंगणात होते. तर आपचे सत्येंद्र जैन हे शकूर बस्ती मतदारसंघातून भाजपचे कर्नैल सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. या महत्त्वाच्या उमेदवारांच्या निकालाकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे.
दिल्लीतील वेगवेगळ्या विधानसभा जागांवर ईव्हीएमच्या संख्येनुसार वेगवेगळ्या फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. कमी फेऱ्या असलेल्या विधानसभा मतदारसंघांचे निकाल लवकर येतील आणि जास्त फेऱ्या असलेल्या विधानसभा मतदारसंघांचे निकाल उशिरा येतील. सकाळी 11.30 वाजल्यापासून निकाल येण्यास सुरुवात होऊ शकते. जर कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही, तर जवळजवळ सर्व विधानसभा मतदारसंघांचे निकाल 2 वाजण्यापूर्वी येऊ शकतात. काही ठिकाणी फेरमोजणी झाल्यास संध्याकाळी उशिरापर्यंत निकाल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.









