आरोपपत्रातील नावाने बदनामी झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि मद्य धोरण घोटाळा प्रकरणाची चौकशी करणारे तपास अधिकारी जोगेंद्र यांना पाठवण्यात आली आहे. संजय सिंह यांनी अधिकाऱ्यांना 48 तासात माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा, असे सांगितले आहे. ईडीने विनाकारण आपले नाव आरोपपत्रात गोवल्याचा दावा आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे. एकाही साक्षीदाराने आपले नाव घेतले नसताना मद्य धोरण प्रकरणात नाव समाविष्ट करून अंमलबजावणी संचालनालयाने माझी बदनामी केली असल्याचे ते म्हणाले. तसेच आपल्याविऊद्ध कोणताही साक्षीदार किंवा पुरावा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









