मद्य धोरण प्रकरणात आणखी एक बडा नेता गजाआड : निवासस्थानावरील छाप्यानंतर कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील बहुचर्चित मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना बुधवारी प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली. बुधवारी सकाळीच ईडीने त्यांच्या निवासांसह मालमत्तांवर धाड टाकली होती. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केली. यापूर्वी याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत.
मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना फ्रेबुवारी 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. सिसोदिया यांची आधी सीबीआयने चौकशी केल्यांनतर त्यांना अटक केली. याचप्रकरणात ईडीनेही उडी घेत, चौकशी आणि धाडसत्र सुऊ केले आहे. दिल्लीच्या मद्य धोरणाच्या संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू आहे. आता खासदार संजय सिंह यांना अटक करत केंद्रीय तपास यंत्रणांनी आम आदमी पक्षाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
पहाटेपासूनच छापेमारी सुरू
अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी बुधवारी पहाटेच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित एका प्रकरणात ईडीची छापेमारी केली. ईडी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणामध्ये कथित मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) केल्यानंतर हे धोरण रद्द करण्यात आले. सीबीआय तपासाच्या शिफारशीनंतर ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला होता.
संजय सिंह यांच्यावरील अटकेच्या कारवाईवरून आता बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोपही होऊ लागले आहेत. ईडीच्या कारवाईवर आम आदमी पार्टीने ‘पक्ष याला घाबरत नाही’ असे म्हटले आहे. ही फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती आहे. संजय सिंह सतत अदानी मुद्यावर प्रश्न उपस्थित करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याचा दावा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रीना गुप्ता यांनी केला.
केजरीवालांचाही हल्लाबोल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यावर प्रतिक्रिया दिली. गेल्या एक वर्षापासून तथाकथित मद्य घोटाळ्याबाबत बराच गाजावाजा होत असल्याचे आपण पाहत आहोत, मात्र तपास यंत्रणांना एक पैसाही मिळालेला नाही. 1,000 हून अधिक छापे टाकण्यात आले. आम आदमी पक्षाला टार्गेट करण्यासाठी कधी वर्गखरेदीत घोटाळा झाला, बस खरेदीत घोटाळा झाला असे आरोप केले जात आहेत. आता पुढच्या वषी निवडणुका येत असल्यामुळे भाजपला पराभवाची भीती आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाईचे अस्त्र उभारले जात असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.









