नवी दिल्ली :
बलात्कार प्रकरणात आरोपी असणारा आम आदमी पक्षाचा पंजाबमधील आमदार हरमित सिंग पठाणमाजरा याने पोलिसांना चकवा दिला आहे. या आमदारावर त्याच्या कथित माजी पत्नीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी एफआयआर सोमवारी पतियाळा येथील सिव्हिल लाईन्स पोलीस स्थानकात सादर करण्यात आला आहे. हा एफआयआर नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. त्याला पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली होती, असा आरोप त्याच्या एका सहकाऱ्याने केला आहे. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार अद्याप त्याला अटक व्हायची आहे. तो हरियाणातील गुरुग्राम येथे गेल्याची माहिती मिळाल्यावरुन पंजाब पोलिसांनी त्याचा पाठलाग केला होता. तथापि, त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करुन पलायन केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याला पकडण्याचा अजूनही प्रयत्न होत आहे. त्याच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे प्रतिपादन त्याचे वकीलाने केला आहे. हरमित सिंग याने स्वत:च्या पक्षाच्याच काही नेत्यांविरोधात आगपाखड केली होती. त्याने पक्षाच्या काही नेत्यांवर पंजाब राज्यातील पूरपरिस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याच्यावर सूडबुद्धीने तक्रार सादर करण्यात आली आहे. त्याला पोलिसांनी बेकायदेशीररित्या पकडले आहे. तथापि, आता तो पोलिसांना हुलकावणी देत असल्याचा बनाव करण्यात येत आहे, असेही त्याच्या वकीलाचे म्हणणे असल्याने या प्रकरणातला गोंधळ वाढला आहे. आम आदमी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पंजाब पोलिस निरीक्षकांना घेराव घालावा, असे आवाहन हरमित सिंग याने केले होते. आमच्याच सरकारचे पोलीस आमच्यावर दबाव आणत आहेत. तथापि, आम्ही अशा दबावाखाली येणार नाही. आमचा हेतू स्वच्छ असून आम्ही स्वपक्षाचे नेते चुकत असतील तर, त्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादनही काही दिवसांपूर्वी या आमदाराने केले होते. त्यामुळे आम आदमी पक्षाने त्याच्याविरोधात हे कुभांड रचल्याचा आरोप त्याच्या समर्थकांनी केला आहे.









