बुलेट जप्त, 20 हजारांचे चलन जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहनांच्या तपासणीदरम्यान झालेल्या वादानंतर दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह यांचा मुलगा मोहम्मद अनस याची बुलेट बाईक जप्त करण्यात आली. तसेच त्याला 20,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी रात्री ओखला परिसरात पोलीस पथकाकडून तपासणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या तपासणीमध्ये सदर बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठा आवाज येत होता. तसेच ही दोन मुले मोटारसायकलवरून चुकीच्या बाजूने येत होती. एवढेच नाही तर तो बाईक झिगझॅग पद्धतीने चालवत होता.
तपासणीदरम्यान दोन तरुण एका दुचाकीवरून जात असताना त्यांना पोलिसांनी रोखले. याप्रसंगी पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचा हवाला देत सायलेन्सर बेकायदेशीर घोषित केले. यानंतर संबंधित तरुणाने आपले वडील आमदार असल्याचे पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि त्या मुलामध्ये वाद झाला. तरीही पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या अनेक कलमांखाली चलन जारी करत दुचाकी जप्त केली. या कारवाईदरम्यान संबंधित बुलेटचालकाने म्हणजेच आम आदमी पक्षाच्या पुत्राने स्वत:चे ओळखपत्र दाखवले नाही. तसेच आपले नाव न सांगता तेथून निघून गेला.









