दिल्लीत आम आदमी पक्षाला झटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत सीमापुरीचे आम आदमी पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा झटका दिला आहे. गौतम यांनी आपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गौतम हे हिंदू देवीदेवतांवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळ वादात सापडले होते.
आप आमदार आणि माजी मंत्री गौतम यांना काँग्रेस संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले. तर गौतम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर आम आदमी पक्षाला सामाजिक न्याय आणि अनुसूचित जाती-जमातीविरोधी ठरविले आहे.
अरविंद केजरीवालांनी मला दोनवेळा आमदार आणि मंत्री होण्याची संधी दिली, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. परंतु मी सामाजिक न्यायाची लढाई लढत आलो असून त्यात केजरीवालांची साथ मिळाली नाही. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी जय भीम शिष्यवृत्ती योजना केजरीवाल सरकारने बंद केली. समुदायाच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी केजरीवालांनी कधीच पुढाकार घेतलेला नाही असा दावा गौतम यांनी केला आहे.









