कथित खंडणी प्रकरणात कारवाई : भाजपचे षड्यंत्र असल्याचा ‘आप’चा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीतील उत्तम नगरचे आमदार नरेश बल्यान यांना शनिवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी एक वर्ष जुन्या कथित खंडणी प्रकरणात सुरुवातीला त्यांना ताब्यात घेतले होते, पण नंतर अटक करण्यात आली. आमदार नरेश बल्यान आणि गुंड कपिल सांगवान उर्फ नंदू यांच्या कथित व्हायरल ऑडिओची चौकशी पोलीस करत आहेत. आम आदमी पार्टीने आमदार नरेश बल्यान यांची अटक हे भाजपचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बल्यान यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना शनिवारी रात्री दिल्ली पोलिसांनी अटक केली. गुन्हेगारी नेटवर्क चालवण्यासाठी वापरलेली सर्व उपकरणे जप्त करण्यासाठी आम्हाला त्यांची चौकशी करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. नरेश बल्यान हे कपिल सांगवान यांच्याशी संपर्कात असल्याचा ठोस दावाही पोलिसांनी केला आहे. तसेच परदेशातून चालणाऱ्या सांगवान ग्रुपसोबतचा संपूर्ण संबंध शोधण्याची गरज आहे. हे कॉल्स आंतरराष्ट्रीय क्रमांक वापरून करण्यात आले होते, या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी, असेही स्पष्ट केले. यावेळी नरेश बल्यान यांच्या वकिलांनी ही अटक बेकायदेशीर आहे, माझ्या अशिलाला सोडण्यात यावे. हा ऑडिओ 2023 चा आहे, त्यात नवीन काही नाही, असा युक्तिवाद केला. मात्र, पुढील चौकशीसाठी न्यायालयाने बल्यान यांची दोन दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली.









