बनावट नोटीस जारी करत खंडणीवसुली : सर्वसामान्य लोकांना देत होता त्रास
वृत्तसंस्था/अमृतसर
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे आमदार रमन अरोडा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. पंजाब दक्षता विभागाने त्यांना नगरपालिकेच्या साहाय्यक नगररचनाकाराकडून झालेल्या भष्टाचारात सामील असल्याप्रकरणी अटक केली आहे. साहाय्यक नगररचनाकार सुखदेव वशिष्ठ यांच्यासोबत मिळून आमदार अरोडा हे खंडणीवसुली करत होते असा आरोप आहे. सुखदेव वशिष्ठ यांच्या माध्यमातून आमदार अरोडा हे लोकांच्या नावाने बनावट नोटीस जारी करवत होते आणि मग लोकांकडून पैसे उकळत होते.
रमन अरोडा यांना अटक केल्यावर दक्षता विभागाने त्यांच्या घरी छापे टाकत काही दस्ताऐवज ताब्यात घेतले आहेत. अमन अरोडा यांची सुरक्षा 10 दिवसांपूर्वीच काढून घेण्यात आली होती. यामुळे तेव्हापासूनच त्यांच्या विरोधात कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. रमन अरोडांनी अनेक अधिकाऱ्यांचा वापर करत बनावट नोटीस जारी करविण्याचे गुन्हेगारी कृत्य सुरू केले होते. ते कुठल्याही चुकीशिवाय लोकांना नोटीस जारी करवित होते आणि मग तडजोडीच्या नावाखाली पैसे उकळत होते. याप्रकरणी आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. रमन अरोडा हे अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांच्या रडारवर होते आणि त्यांना अटक करण्यापूर्वी पूर्ण चौकशी केली जात होती. रमन अरोडा हे जालंधर मध्य मतदारसंघाचा आमदार आहे.









