नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. भ्रष्टाचार आणि हवाला प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत आहे. कोलकाता येथे नोंद असलेल्या एका कंपनीच्या माध्यमातून हा बेकायदा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सत्येंद्र जैन हे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात.
2 महिन्यांपूर्वी सीबीआयने जैन यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या 4.81 कोटी रुपयांच्या बेकायदा संपत्तीवर टाच आणली होती. तेव्हापासून हे प्रकरण गाजत होते. त्यांच्या विरोधात 2017 मध्येच हे प्रकरण दाखल झाले होते. त्यांनी अनेक बनावट कंपन्या स्थापन करुन ही 4.81 कोटी रुपयांची रक्कम मिळविली होती, असे त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. या रकमेचा उपयोग जमीनीची खरेदी आणि शेतजमीनीच्या खरेदीसाठी करण्यात आला होता, असाही आरोप त्यांच्यावर सीबीआय आणि ईडीने ठेवला आहे.
दिल्लीतील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. ऋषी राज यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली असता त्यांच्या घरात सत्येंद्र जैन यांच्या बेकायदा संपत्तीविषयीची कागदपत्रे सापडली होती. या आधारावर जैन यांच्याविरोधात कारवाईला प्रारंभ करण्यात आला होता. दोन-तीन वेळा त्यांची चौकही करण्यात आली होती. आता त्यांना याच कारवाईचा पुढचा भाग म्हणून अटक करण्यात आली आहे.









