केजरीवाल यांच्या घरी एसीबी, 15 कोटीच्या आरोपामुळे उपराज्यपालांची कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे काही विद्यमान आमदार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीतील या पक्षाचे काही उमेदवार यांना भारतीय जनता पक्षाने प्रत्येकी 15 कोटी रुपयांचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि संजयसिंग यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने यासंदर्भात दिल्लीच्या उपराज्यपालांकडे तक्रार सादर केली आहे. उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार एसीबीने चौकशी हाती घेतली आहे.
एसीबीचे एक पथक चौकशीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या घरी शुक्रवारी सकाळी पोहचले. तथापि, केजरीवाल घरी नसल्याने त्यांची चौकशी होऊ शकली नाही. संजयसिंग यांच्या कार्यालयातही एसीबीचे पथक पोहचले. सिंग यांची त्यांच्या कार्यालयातच कसून चौकशी करण्यात आली आहे. ही चौकशी पुढे काही काळ होत राहण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाने गुरुवारी रात्री एक फोन क्रमांक प्रसिद्ध केला होता. याच फोन क्रमांकावरुन आपल्या आमदारांशी आणि उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे, असा या पक्षाचा दावा आहे.
नंबर स्वीच ऑफ
आम आदमी पक्षाने जो क्रमांक उघड केला आहे. त्या क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न काही पत्रकारांनी करुन पाहिला. मात्र, हा क्रमांक स्वीच ऑफ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आम आदमी पक्षाचा आरोप खरा आहे, की तो केवळ राजकीय स्टंट आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
भारतीय जनता पक्ष आक्रमक
आम आदमी पक्षाचा आरोप धादांत खोटा आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला दारुण पराभव होणार, याची या पक्षाला शाश्वती असल्याने नैराश्यापोटी असे आरोप केले जात आहेत. असा प्रकार आम आदमी पक्षाने आतापर्यंत अनेकदा केला असून नंतर खोटा आरोप केल्याने क्षमायाचनाही या पक्षाला करावी लागली आहे. मात्र, यावेळी या पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्या असून आपल्या नेत्यांना प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नाव घेऊन करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही दिल्लीच्या उपराज्यपालांकडे तक्रार सादर केली असून एसीबीकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी शुक्रवारी केले आहे.
आरोप नेमका काय…
आम आदमी पक्षाचे नेते मुकेश अहलावत यांनी गुरुवारी एक गंभीर आरोप केला होता. त्यांनी एक दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करुन या क्रमांकावरुन आपल्याला वारंवार फोन येत असल्याचा आरोप केला. आपल्याला आम आदमी पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. तथापि, आपण जीवात जीव आहे, तो पर्यंत हा पक्ष सोडणार नाही, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर या पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनीही सात नेत्यांना असे आमिष भारतीय जनता पक्षाकडून दाखविले जात आहे, असा आरोप केला. नंतर केजरीवाल यांनी 16 नेत्यांना असे दूरध्वनी आल्याचा आरोप केला.
आप एक्झिट पोलवर नाराज
दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले. अनेक संस्थांच्या सर्वेक्षणांमधून आपची सत्ता जाणार असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. या सर्व सर्वेक्षणांवर या पक्षाने नाराजी व्यक्त केली असून त्यांची अनुमाने शनिवारी खोटी ठरतील आणि आपचाच विजय होईल असा दावा या पक्षाने केला आहे.









