मंदिरात जाणाऱया महिलांबद्दल काढले अनुद्गार ः पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींना उद्देशून अपशब्द
वृत्तसंस्था / अहमदाबाद
आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्यावर हिंदू आणि महिलाविरोधी असल्याचा आरोप जोर पकडू लागला आहे. इटालिया यांनी धर्म-अध्यात्मावर विश्वास ठेवणाऱया हिंदू महिलांबद्दल वारंवार अनुद्गार काढल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी इटालिया यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात इटालिया हे हिंदू महिलांना उद्देशून शिवी घालत असल्याचे दिसून येते. इटालिया यांच्यामुळे आम आदमी पक्ष गुजरातमध्ये अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे.

इटालिया यांच्यावर अपशब्द वापरल्याचा आरोप करत भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली आहे. गोपाल इटालिया हे केवळ प्यादे असून महिलांचा अपमान करण्याचा पूर्ण खेळ दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांच्या सुचनेनुसार सुरू आहे. इटालिया यांनी केजरीवाल यांच्या निर्देशावरच आक्षेपार्ह टिप्पणी केल्या आहेत. हिंदू समाज आणि मंदिरात जाणाऱया महिलांचा अपमान होईल अशाप्रकारची विधाने इटालिया यांनी केली असल्याचा दावा इराणी यांनी केला आहे.
भाजपचे आयटी विभाग प्रमुख मालवीय यांनी एक व्हिडिओ ट्विट करत इटालिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आप गुजरात प्रदेशाध्यक्ष आणि केजरीवालांचे निकटवर्तीय गोपाल इटालिया एकामागोमाग एक गुन्हे करत आहेत. महिलांसाठी अपमानास्पद आणि गलिच्छ टिप्पणी त्यांच्याकडून केली जात आहे. मंदिरात आणि प्रवचन ऐकण्यास जाणाऱया महिलांना ते शिवी देत आहेत. आता तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वृद्ध मातोश्रींना ड्रामेबाज संबोधिले असल्याचा आरोप मालवीय यांनी पुराव्यादाखल इटालियाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
इराणी यांच्याकडून लक्ष्य
इराणी यांनी गुरुवारीही इटालिया यांचा व्हिडिओ ट्विट करत केजरीवालांवर निशाणा साधला होता. अरविंद केजरीवालांच्या आशीर्वादाने इटालिया आता हीराबेन यांच्यासाठी अपशब्द वापरत आहेत. तुमच्या वर्तनाचे आकलन करण्यात आले असून तुमचा पक्ष गुजरातमध्ये राजकीयदृष्टय़ा समाप्त होईल आणि आता जनता न्याय करणार असल्याचे इराणी यांनी केजरीवालांना उद्देशून म्हटले होते. अरविंद केजरीवाल हे आणखी खालची पातळी गाठू शकतात यात कुठलेच आश्चर्य नाही. गुजरात आणि गुजराती समाजात महिला, विशेषकरून मातांचा अत्यंत आदर केला जातो हे त्यांना उमगत नसल्याचे इराणी यांनी शुक्रवारी म्हटले आहे.
इटालियांवर गंभीर आरोप
आम आदमी पक्षाला आगामी निवडणुकीत राज्यातून हद्दपार करण्याचा संकल्प गुजरात आणि गुजरातींनी घेतला आहे. आप नेते गुजरातमध्ये हिंदू महिला आणि धार्मिक संस्थांच्या विरोधात वक्तव्ये करत स्वतःचे राजकारण चमकवू पाहत आहेत. आप नेत्याकडून 100 वर्षीय हीराबेन यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली आहे. हीराबेन यांचा राजकारणाशी कुठलाच संबंध नसल्याने हा प्रकार अक्षम्य आहे. केजरीवालांच्या गलिच्छ राजकारणाला थारा मिळू न देणाऱया नरेंद्र मोदींना जन्म दिला हीच हीराबेन यांची चूक असावी. पंतप्रधानांच्या मातोश्रींबद्दल अनुद्गार काढून गुजरातमध्sय राजकीय लोकप्रियता मिळण्यास मदत होईल असा विचार केजरीवाल करत असतील तर तो चुकीचा आहे. या चुकीसाठी गुजरात आणि गुजराती लोक आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाला धडा शिकवतील असे इराणी म्हणाल्या.









