नरेलामधून शरद चौहान, हरिनगरमध्ये सुरिंदर सेतिया लढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने दोन जागांवर उमेदवार बदलले आहेत. नरेला येथील विद्यमान आमदार शरद चौहान यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे. याआधी दिनेश भारद्वाज यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. हरिनगरमधून राजकुमार ढिल्लन यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. येथे आता सुरिंदर सेतिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
‘आप’ने सर्व 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यावेळी ‘आप’ने 20 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली होती, तर तीन आमदारांऐवजी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना तिकिटे देण्यात आली होती. ज्या आमदारांचे तिकीट कापले गेले त्यात शरद चौहान यांचा समावेश होता. मात्र, त्यांना शेवटच्या क्षणी पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल यांनी इतर पक्षांमधून आलेल्या अनेक नेत्यांनाही संधी दिली आहे.
‘आप’च्या पहिल्या यादीत 11 पैकी सहा उमेदवार इतर पक्षांमधून आलेले नेते होते. तर दुसऱ्या यादीत 15 विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली. तिसऱ्या यादीत कैलाश गेहलोत यांच्या जागी तरुण यादव यांना उमेदवार घोषित करण्यात आले. याशिवाय, जवळजवळ सर्व उमेदवारांची अंतिम यादीत पुनरावृत्ती झाली. आम आदमी पक्षाने अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली असली तरी दुसरीकडे तीन जागांवर आमदारांच्या मुलांना आणि पत्नींना तिकिटे देण्यात आली आहेत. कृष्णा नगर जागेसाठी आपने एस. के. बग्गा यांच्याऐवजी त्यांचा मुलगा विकास बग्गा यांना तिकीट दिले. त्याचप्रमाणे चांदणी चौक जागेवर प्रल्हाद साहनी यांच्या जागी त्यांचा मुलगा पुरूणदीप साहनी यांना संधी मिळाली. तसेच उत्तम नगरचे आमदार नरेश बाल्यान हे सध्या खंडणी आणि वसुली प्रकरणात तुरुंगात असल्यामुळे ‘आप’ने त्यांच्या पत्नी पॉश बाल्यान यांना तिकीट दिले आहे.









