वृत्तसंस्था / .नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. मुख्य संघर्ष भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यात होणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा लागली असून शब्दयुद्ध जोरदारपणे होत आहे. याच ओघात शनिवारी आम आदमी पक्षानेच भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा केल्याने निवडणूक प्रचारात वेगळाच रंग भरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते रमेश बिधुरी यांची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून निवड केली असल्याची माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे, असे प्रतिपादन अरविंद केजरीवाल यांनी केले. सध्याच्या मुख्यमंत्री आतीशी मारलेना यांनीही बिधुरीच भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे वक्तव्य केले होते. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार येत्या एक दोन दिवसात भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करणार आहे.
अमित शहा यांच्याकडून खिल्ली
भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल ते आम्ही ठरवू. आम आदमी पक्षाने आपल्या चेहऱ्याकडे पहावे. आम आदमी पक्षाला त्याचा पराभव होणार याची खात्री असल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उठाठेवी करण्यास प्रारंभ केला आहे, अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल यांनी व्यक्त पेलेल्या अनुमानाची खिल्ली एका जाहीर सभेत उडविली.









