मनीष सिसोदिया पटपडगंजऐवजी जंगपुरा येथून लढणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने (आप) सोमवारी 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. येथे येत्या फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. यापूर्वी पक्षाने पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आता दुसऱ्या यादीत अनेक मोठे बदल दिसून येत आहेत. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आता पटपडगंजमधून न लढता जंगपुरामधून निवडणूक लढवणार आहेत. शिक्षणतज्ञ अवध ओझा यांना पक्षाने पटपडगंजमधून तिकीट दिले आहे. ओझा यांनी नुकताच ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे.
दुसऱ्या यादीत समाविष्ट मतदारसंघांमधील 20 पैकी 19 जागा मागच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. गांधीनगर मतदारसंघातून भाजप विजयी झाला होता. यावेळी पक्षाने आपल्या 19 विद्यमान आमदारांपैकी 16 आमदारांची तिकिटे रद्द केली आहेत. चांदणी चौकातून विद्यमान आमदार प्रल्हादसिंह साहनी यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले असून ते सध्या येथून नगरसेवक आहेत. भाजप सोडून ‘आप’मध्ये प्रवेश केलेल्या जितेंद्र सिंह शुंटी यांना शाहदरा आणि सुरिंदर पाल सिंह बिट्टू यांना तिमारपूरमधून तिकीट मिळाले आहे. जितेंद्र सिंह शुंटी यांना आप आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांचा मतदारसंघ मिळाला आहे. तर दिलीप पांडे यांच्या जागी बिट्टू निवडणूक लढवणार आहेत.
दिल्लीत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्ष पूर्ण खबरदारी घेत आहे. दुसऱ्या यादीत सिसोदिया यांच्या जागेबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावेळी पटपडगंजमधून मोठ्या मुश्किलीने निवडणूक जिंकलेल्या सिसोदिया यांना जंगपुरा येथून रिंगणात उतरवले आहे. तर पटपडगंजमधून अवध ओझा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
‘आप’ने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या 11 उमेदवारांच्या यादीत 5 आमदारांना तिकीट दिलेले नाही. पक्षाने आतापर्यंत एकूण 31 जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून 21 विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द केली आहेत. दुसऱ्या यादीत भाजप किंवा काँग्रेसमधून ‘आप’मध्ये प्रवेश केलेल्या तिघांची नावे आहेत.









