सोमवारी पक्षप्रवेश केलेल्या छत्रपाल यांना उमेदवारी
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने 9 उमेदवारांची दुसरी यादी जारी केली आहे. सोमवारीच भाजपला रामराम ठोकून पक्षात सामील झालेले प्राध्यापक छत्रपाल यांना बरवाला मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने आतापर्यंत 29 उमेदवार जाहीर केले आहेत.
साढौरा येथे रीता बमनैया यांना संधी देण्यात आली आहे. थानेसरमध्ये कृष्ण बजाज तर इंद्री येथे हवा सिंह हे पक्षाचे उमेदवार असतील. रतियामध्ये मुख्त्यार सिंह बाजीगर, आदमपूरमध्ये भूपेंद्र बेनीवाल, बावल येथे जवाहरलाल यांना तिकीट देण्यात आले आहे. फरीदाबादमध्ये प्रवेश मेहता आणि तिगांवमध्ये अबाश चंदेला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आघाडीची चर्चा अयशस्वी
काँग्रेस आणि आप यांच्यात मागील 5 दिवसांपासून आघाडीसंबंधी चर्चा सुरू होती. काँग्रेसच्या वतीने दीपक बाबरिया तर आप नेते राघव चड्ढा यांच्यात चर्चा सुरू होती. आम आदमी पक्षाने 10 हून जागांची मागणी केली होती. तर काँग्रेसने 3 पेक्षा अधिक जागा सोडण्यास नकार दिला होता. काँग्रेसकडून सकारात्मक संकेत न मिळाल्याने आम आदमी पक्षाने सोमवारी संध्याकाळी 20 उमेदवारांची पहिली यादी जारी केली होती.
भाजपमधून आलेल्या नेत्याला उमेदवारी
2 दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देणारे मुख्तियार सिंह बाजीगर यांना आम आदमी पक्षाने रतिया मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. मुख्तियार हे यापूर्वी 20 वर्षांपर्यंत इंडियन नॅशनल लोकदल या पक्षात होते. 2014 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले होते. भाजपने रतिया मतदारसंघात सुनीता दुग्गल यांना उमेदवारी दिल्याने नाराज होत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. येथे बाजीगर समुदायाचे सुमारे 20 हजार मतदार आहेत.









