पंतप्रधान मोदींवर लोकांचा विश्वास असल्याची टिप्पणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मन की बात या कार्यक्रमाचे 100 एपिसोड्स पूर्ण होणार असल्याने बुधवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. या कार्यक्रमात बोलताना बॉलिवूड अभिनेता आमिर खानने ‘मन की बात’ला जनआंदोलन ठरवत याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांसोबत एक विश्वासार्ह नाते निर्माण केल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींचा मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’चा 100 एपिसोड 30 एप्रिल रोजी प्रसारित होणर आहे. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यावर मोदींनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती.
लोक मोदींवर विश्वास ठेवू इच्छितात आणि त्यांच्या सूचनांचे पालन करू इच्छितात. लोकांचा मोदींवर भरवसा आहे आणि मोदींनी जनतेसोबत हे विशेष नाते निर्माण केले आहे. विश्वास आपोआप निर्माण होत नाही, तो निर्माण करावा लागतो, स्पष्ट स्वरुपात मोदींनी हा विश्वास कमाविला असल्याचे आमिर खानने म्हटले आहे.
मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी लोकांसोबत संवाद साधतात, यात महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर चर्चा होते, भविष्यासंबंधी विचार मांडण्यासह सूचना त्यांच्याकडून केल्या जातात. अशाप्रकारच्या संवादातून पंतप्रधान मोदी हे देशउभारणीत लोकांचे समर्थन मिळवू पाहत असल्याचे उद्गार आमिरने काढले आहेत.
पंतप्रधान मोदींनी अत्यंत यशस्वीपणे या कार्यक्रमाचे संचालन केले आहे आणि त्यांना लोकांचे समर्थन प्राप्त आहे. लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न केल्याने हे घडले आहे. हा प्रयत्न जगातील कुठल्याही समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे माझे मानणे आहे. आपण जी योजना तयार करतोत, त्याविषयी संवाद साधण्याचा आणि लोकांना विश्वासात घेणे नेत्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे आमिरने नमूद केले आहे.









