दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाला वेगळे वळण शक्य
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पुष्कळ काळापासून गाजत असलेले दिल्ली मद्यघोटाळा प्रकरण आता नव्या वळणावर उभे असलेले दिसत आहे. या प्रकरणात आता दिल्ली राज्यात सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाचे नेतेच नव्हे, तर त्या पक्षालाच आरोपी करण्याची तयारी होत असल्याचे वृत्त आहे. या साठी सीबीआयकडून कायदेशीर सल्ला घेतला जाईल, असे समजते. प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने यासंबंधी सीबीआयला पत्र पाठविले असून लवकरच मोठी कारवाई होणे शक्य आहे. आम आदमी पक्ष या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आला तर एखाद्या राजकीय पक्षालाच आरोपी करण्याची हा भारताच्या इतिहासातील प्रथम प्रसंग असेल. या कथित घोटाळ्यातील पैसा आम आदमी पक्षाला मिळाला असेल, तर या पक्षालाच आरोपी का करण्यात आलेले नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेही ईडीला विचारला होता. त्यानंतरच ईडीने सीबीआयला पत्र पाठवून ही शक्यता पडताळून पाहण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार आता सीबीआय कायदेशीर सल्ला घेण्यावर विचार करत आहे, अशी माहिती मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी
या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी या घोटाळ्यातील पैशाचा ट्रेल स्पष्ट करताना ईडीने तो पैसा निवडणुकांसाठी उपयोगात आणल्याचे प्रतिपादन केले होते. त्यामुळे न्यायालयाने आम आदमी पक्षालाच आरोपी का करण्यात आलेले नाही, अशी विचारणा केली होती. परिणामी, आता हे प्रकरण प्रत्यक्ष आम आदमी पक्षाच्याच गळ्यात पडणार, अशी चर्चा होत आहे. कायदेशीर सल्ला सीबीआयला काय दिला जातो, यावर पुढील घडामोडी ठरणार आहेत, असे मत अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
आम आदमी पक्षाचा विरोध
आम आदमी पक्षालाच गुंतविण्याचा प्रयत्न ईडी करत असून हा नवा अपप्रचार आहे, असा आरोप या पक्षाच्या नेत्या अतीशी यांनी केला. मनिष सिसोदिया आणि इतर नेत्यांच्या विरोधात काय पुरावा आहे, हे देशासमोर ठेवावे, असे आव्हान त्यांनी दिले. संजय सिंग यांच्या घरावर धाड घातल्यानंतरही काहीही सापडलेले नाही, असाही दावा त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.
जामीनावर सुनावणी प्रलंबित
मनीष सिसोदिया यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. आपली पत्नी आजारी असल्याने तिच्याकडे लक्ष देण्यासाठी जामीनावर मुक्त केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केली जात आहे. मात्र, आता ही सुनावणी 12 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सिसोदिया गेल्या फेब्रुवारीपासून कारागृहात आहेत. त्यांनी अनेकदा जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केले होते. तथापि अद्याप त्यांना यश मिळालेले नाही.
परिणाम काय होईल…
आम आदमी पक्षाला जर आरोपी करणे शक्य झाले तर याचे परिणाम काय होणार याचीही चर्चा आता होत आहे. विधीतज्ञांमध्ये या वर मतमतांतर आहेत. बेकायदेशीर कृत्याचा लाभार्थी जर एक राजकीय पक्ष असेल, त्याला कायद्याप्रमाणे आरोपी करता येते कारण पक्ष ही एक संस्था असून तिला व्यक्तीचे सर्व कायदे लागू होतात, असे अनेक विधीतज्ञांचे मत असल्याचे दिसून येत आहे. आरोप सिद्ध झाल्यास आम आदमी पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, असेही मत आहे.
पक्षावरच टांगती तलवार
- आम आदमी पक्षाच्या अस्तित्वावरच टांगती तलवार असल्याचे स्पष्ट
- आम आदमी पक्षाचा भाजपवर राजकीय सूडबुद्धीने वागल्याचा आरोप
- कायदा त्याचे काम करणार, भाजपकडून आम आदमी पक्षाला प्रत्युत्तर









