पक्षाचे आणखी दोन नगरसेवक भाजपमध्ये सामील
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. सूरत या शहरात आम आदमी पक्षाला झटका देत त्याच्या दोन नगरसेवकांनी सत्तारुढ भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर 6 दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाच्या 6 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे आम आदमी पक्षाच्या सूरतमधील नगरसेवकांची संख्या आता 27 वरून कमी होत 15 राहिली आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये सूरत महापालिका निवडणुकीत ‘आप’ने लक्षणीय कामगिरी केली होती. 120 सदस्यीय महापालिकेत 27 जागा जिंकून आप हा मुख्य विरोधी पक्ष ठरला होता. तर भाजपला 93 जागांवर यश मिळाले होते. र्कांग्रेसला खातेही उघडता आले नव्हते.
भाजप आमच्या नगरसेवकांना प्रलोभने देण्यास धमकावत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. आप नगरसेविका दीप्ति सकारिया यांनी यापूर्वी भाजपच्या एका मंत्र्याकडून पक्षप्रवेशासाठी पैशांचे आमिष दाखविण्यात आल्याचा दावा केला होता.









