अनेक ठिकाणी टँकर चालकांची गर्दी : पाणी समस्या बनतेय गंभीर : गावांतील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
बेळगाव : सध्या तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर होवू लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील काही गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे तालुक्यात सध्यातरी पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. दरम्यान ही पाणी समस्या सोडविण्यासाठी अनेकांनी आता खासगी टँकरवर भर दिला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी नेण्यासाठी अनेक ठिकाणी टँकरचालक केंद्रांवर गर्दी करत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय तसेच वापरण्यासाठीही आता पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे बहुतेक नागरिक आता खासगी टँकरवर अवलंबून राहत आहेत. अनेकांना तर ते आणण्यासाठीही पैसे नसल्याने समस्या निर्माण होत आहे. मात्र टँकरच्या मागणीत वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात टँकरचालक पाणी देण्याच्या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी होत असून रांगाही लागत आहेत. अनेक ठिकाणी आपण घागरीच्या रांगा लागलेल्या पाहिल्या आहेत. मात्र आता तालुक्यात टँकरच्याही रांगा लागत आहेत.
तालुक्यात सध्या पाण्याचा ठणठणाट पसरला आहे. अनेक गावांना 15 ते 20 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून ती सोडविण्यासाठीही अधिकाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कधी एकदा पाऊस पडणार आणि पाणी समस्या सुटणार, असाच प्रश्न आता साऱ्यांना पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर मोठी समस्या निर्माण होत असून यासाठी नियोजनाची गरजही निर्माण होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून विहिरींनीही तळ गाठला आहे. काही गावांत तर शेतातील विहिरींचे पाणी बैलगाडीमध्ये टाकी ठेवून आणावे लागत आहेत. अशी परिस्थिती असतानाही पाण्याचे कोलमडलेले नियोजन लावण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. परिणामी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत असून टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्यांनाही अधिक काम लागल्याचे दिसून येत आहे.









