अन्नभाग्यसाठी निष्क्रिय बँक खातेधारकांना आवाहन
बेळगाव ; सरकारने अन्नभाग्य योजना जारी केली आहे. याअंतर्गत प्रति लाभार्थ्याला 170 रुपये दिले जात आहेत. मात्र, काही लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत. तर काही लाभार्थ्यांची बँक खातीच नाहीत. अशा लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविताना अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रथमत: लाभार्थ्यांनी बँक खात्याला 20 जुलैपर्यंत आधार लिंक करावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे. ज्या लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत, अशा लाभार्थ्यांची यादी संबंधित रेशन दुकानदाराकडे उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी रेशन दुकानदाराकडे चौकशी करावी आणि बँक खाती सुरळीत सुरू करावीत. जिल्ह्यात 11 लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी 1 लाख 40 हजार लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्नभाग्य रोख रक्कम योजना अडचणीत येऊ लागली आहे. जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार 1 कुटुंबप्रमुखांच्या खात्यात तब्बल 46 कोटी 54 लाख 18 हजार 520 रुपये जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.









