ऍपच्या माध्यमातून आधार क्रमांक लिंक करण्याचे महापालिकेच्यावतीने नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नागरिक आधार ओळखपत्र व क्रमांक देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आधार जोडण्याच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे व्होटर्स हेल्पलाईन या ऍपच्या माध्यमातून आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
आधार ओळख क्रमांक किंवा झेरॉक्स प्रतीच्या आधारे गैरप्रकार होत आहेत. त्यामुळे नागरिक सहजासहजी आधार ओळखपत्र देत नाहीत. सध्या मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक लिंक करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याकरिता महापालिकेचे कर्मचारी तसेच बीएलओ आधार ओळखपत्राची झेरॉक्स घेण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. परिणामी आधार क्रमांक लिंक करण्याचे काम रखडले आहे. गैरप्रकार होण्याच्या धास्तीमुळे नागरिक आधार ओळखपत्र देण्यास टाळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आधार लिंक करणे सोयीचे असून नागरिकांना आपल्या मोबाईलद्वारे आधार क्रमांक लिंक करता येते. याकरिता प्रथम प्लेस्टोअरच्या माध्यमातून व्होटर्स हेल्पलाईन हे
ऍप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यावर व्होटर्स रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक केल्यानंतर व्होटर्स सर्व्हिसेसची माहिती मोबाईलच्या स्क्रिनवर उपलब्ध होते.
त्यामधील इलेक्ट्रॉल ऍथेंटिकेशन फॉर्मवर क्लिक करावे लागणार आहे. स्क्रिनवर उपलब्ध झालेल्या ठिकाणी मतदारांचे नाव व इतर माहिती तसेच मोबाईल नंबर नोंद करावा लागणार आहे. त्यानंतर ओटीपी क्रमांक मोबाईलवर येतो. तो क्रमांक नोंद केल्यानंतर आधार क्रमांक टाईप करून अपडेट केल्यास मतदारांना घरबसल्या आधार क्रमांक लिंक करता येवू शकतो. या ऍपद्वारे नागरिकांनी आधार क्रमांक लिंक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऍपचा वापर करून क्रमांक लिंक करा
व्होटर्स हेल्पलाईन ऍपद्वारे आधार क्रमांक लिंक करता येऊ शकते. याकरिता या ऍपचा वापर करून नागरिकांनी आधार क्रमांक लिंक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









