कामगार मंत्री संतोष लाड यांची विकास आढावा बैठक : बोगस नोंदणीवर पायबंद घालणार
बेळगाव : कामगार खात्याकडून बांधकाम कामगारांसाठी अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे अनेक जणांकडून खोटी माहिती देऊन बोगस बांधकाम कामगारांची नोंद करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांना नोंद करण्यासाठी यापुढे आधार कार्ड सक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून बोगस बांधकाम कामगार नोंदणीवर पायबंद घालण्याचा प्रयत्न कामगार खात्याकडून सुरू करण्यात आला आहे. नुकताच जिह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कामगार मंत्री संतोष लाड यांनी घेतलेल्या विकास आढावा बैठकीत बोगस बांधकाम कामगारांचा नोंदणी मुद्दा चर्चेला आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांची नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून बांधकाम कामगारांची नोंदणी करताना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांनी पूर्ण चौकशी करूनच नोंदणी करावी. तसेच नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात यावे. त्यामुळे भविष्यातील बोगस बांधकाम कामगार नोंदणीवर पायबंद घालणे शक्य होणार आहे, असा आदेश कामगार मंत्र्यांनी बजावला आहे. यावरून कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांकडून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच सध्या नोंदणी करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांची नोंदणी योग्य आहे का याची शहानिशा करून अहवाल देण्याचे सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच जिह्यामध्ये नोंदणी करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांचे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. नोंदणी पूर्ण होईपर्यंत बांधकाम कामगारांना कामगार खात्याच्या सुविधांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
सुविधा योग्य कामगारांनाच
बोगस कामगारांची होणारी नोंद रोखण्यासाठी कामगार खात्याकडून सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. ही प्रक्रिया योग्य आहे. यामुळे कामगार खात्याच्या सुविधांचा लाभ योग्य कामगारांना मिळणार आहे.
-अॅड. एन. आर. लातूर (बांधकाम कामगार नेते)









