पुणे / प्रतिनिधी :
अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग आणि त्यांच्याकडून वापरले जाणारे कोयते याचा प्रभाव कमी करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एक नवीन नियमावली तयार केली आहे. त्याअंतर्गत शहरातील कोयते विक्रेत्यांना आता कोयते खरेदी करणाऱ्यांची नोंद ठेवावी लागणार आहे. आधार कार्ड बघूनच त्यांना ग्राहकांना कोयते विकावे लागणार आहेत. ही कारवाई करण्यासाठी प्रत्येक परिमंडळच्या पोलिस उपायुक्त यांना लक्ष ठेऊन आढावा घ्यावा लागणार आहे.
पुणे शहरातील मध्यवर्ती शाळेबाहेर कोयता घेऊन अल्पवयीन मुलांनी घातलेला राडा, येरवडा परिसरातील दगडफेक अन् कोयत्याच्या सहाय्याने माजवलेली दहशत, मागील महिनाभरात कोयता गँगने मांडलेला उच्छाद या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी कडक पावले उचलली आहेत. यापुढे बेकायदेशीररीत्या कोयते विक्री करताना कुणी आढळल्यास अथवा कोणाकडे कोयता आढळल्यास संबंधिताला कारवाईलादेखील सामोरे जावे लागणार आहे. पर्यायी त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल होणार आहेत.
अधिक वाचा : कसब्याच्या जागेवरून आघाडीत बिघाडी
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील कोयत्याच्या घटना पाहता पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यांच्या हद्दीत ज्या ठिकाणी कोयते विक्री सुरू असेल, त्या ठिकाणची नोंद ठेवावी. त्याचप्रमाणे कोयते विक्रेत्यांनी कोयते विकत घेणाऱ्यांची नोंद ठेवावी. त्यांची आधार कार्डची झेरॉक्स जमा करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलांकडेही कोयते मिळू लागल्याने पोलिसांनी कोयत्याबाबत कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. पुणे शहराबाहेर कोणी कोयते घेऊन आल्यास वा गुन्हेगारी कृत्यात दिसल्यावर त्यांच्यावर अर्मस ऍक्टनुसार कारवाई करण्यात येईल.