जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, नोंदणी प्रक्रियेला चालना
प्रतिनिधी/ बेळगाव
स्थावर मालमत्तेसह कागदोपत्री नोंद करण्यासाठी यापुढे आधारकार्ड जोडणी आवश्यक आहे. आधार जोडणीनंतरच मालमत्ता नोंदणीमध्ये होणारे गैरकारभार रोखणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
स्थावर मालमत्ता नोंदणीसाठी आधार लिंक करणे सक्तीचे केल्याने या प्रक्रियेला चालना देऊन ते बोलत होते. येथील उपनोंदणी कार्यालयात शनिवारी या उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
ते पुढे म्हणाले, मालमत्ता नोंदणी करताना आधार परवानगी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. नियोजित नमुन्यानुसार यासाठी परवानगी घ्यावी लागते. नोंदणी करणाऱ्या मालमत्ताधारकाचा आधारकार्ड क्रमांक लिंक करताना मोबाईलवर ओटीपी दिला जातो. तीस सेकंदांमध्ये या ओटीपीला अनुमोदन दिल्यानंतर पुढील प्रक्रिया होते. ही प्रक्रिया गैरकारभार रोखण्यास सोयीची ठरणार आहे.
मालमत्ता नोंदणी दरम्यान होणारे गैरकारभार अथवा त्रुटी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन नोंदणी करावी, नागरिकांनीही या सुविधेचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा नोंदणी अधिकारी महांतेश पटातर म्हणाले, मालमत्ता नोंदणी दरम्यान बेकायदेशीर व्यक्तींचा अंगठा लावणे अथवा सही घेणे, बेकायदेशीर नोंदणी करणे, असे प्रकार आधार लिंकमुळे रोखणे शक्य होणार आहेत. कावेरी 2.0 तंत्रज्ञानामध्ये स्थावर मालमत्ता नोंदणी आधार नोंदणीच्या माध्यमातून केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.









